भद्रावती : कुरोडा गाव परिसरात फिरत असलेल्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल विधानसभा अध्यक्ष रोहित सोलंकी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली.
भद्रावती शहर परिसरा लगत असलेल्या कुरोडा या गाव परिसरात एका पट्टेदार वाघाचे दर्शन कित्येक शेतकरी व वाटसरूंना झाले. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री बेरात्री शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता व पिकांची राखण करण्याकरिता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. भद्रावती कडून गावाकडे जाण्याकरिता दिवसा किंवा रात्री ग्रामस्थांचे ये – जा करणे कठीण झाले आहे. तसेच शाळकरी विद्यार्थाना देखील शाळेत जाणे बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कुरोडा, केसूर्ली, विंजासन, चारगाव व देऊरवाडा या भागातील ग्रामस्थ वाघाच्या भीतीने कमालीचे धास्तावले आहे. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन बजरंग दलाचे विधानसभा अध्यक्ष रोहित सोळंकी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिले आहे.






