यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा संपन्न…
भद्रावती
‘चमत्कारामागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. पुंडलिक जाधव यांनी प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी , भद्रावती येथे अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव, डॉ. कार्तिक शिंदे,व्याख्याते पुंडलिक जाधव चंद्रपूर, प्राचार्य डॉ. सुधीर मोते विचार मंचावर उपस्थिती होते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचे कर्तव्य दिले. वैज्ञानिक दृष्टीकोन हा केवळ वैचारिक आदर्श नाही, तर लोकशाहीचे प्राणतत्त्व असल्याचे मत कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी व्यक्त केले.
अंधश्रद्धेविरुद्धचा लढा फक्त भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी नसून तो मानवी प्रतिष्ठा, समानता आणि विवेकाधिष्ठित समाजरचनेचा लढा आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णत: रुजला नाही, अशी ख़त संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी व्यक्त केली. प्रा. पुंडलिक जाधव यांनी व्याख्यानातून सविस्तर मार्गदर्शन करत असताना भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाला आश्चर्यचकित करणारी प्रगती केली आहे. सरकारने अनेक वेळा पुराव्यावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित निर्णय घेतले. चुकीची माहिती, चमत्कारिक उपचार, कटकारस्थानांच्या अफवा, अंधश्रद्धाळू मेसेज सोशल मीडियामुळे सहज पसरतात. घटनात्मक तत्त्वांचा आधार घेऊन विवेक, तर्कशक्ती आणि चिकित्सक वृत्ती जोपासणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन यावेळी करून काही प्रात्यक्षिके करून दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण मत्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हरिहर मोहरकर यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






