पालकमंत्री ना. अशोक उईके यांना निवेदन
जांभुळघाट येथील पोस्ट बेसीस निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षीका यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी आदीवासी टायगर सेनेचे चंद्रपुर जिल्हा महासचीव डॅा. ज्ञानेश्वर जमनाके यांनी केली आहे.
दिनांक ८ व ९ आगष्टला जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन करण्यासाठी रात्रोच्या वेळी शिळे अन्न दिल्या गेल्याने २६७ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली होती. काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले होते तर काही विद्यार्थ्यांना जांभुळघाट आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर पडू नये म्हणून आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक व अधीक्षीका यांनी विद्यार्थ्यांना धाकदपट करून विषबाधेचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी संपर्क केला व या प्रकरणाचे बिंग फुटले.
या घटनेची दखत आदीवासी टायगर सेना यांनी घेतली. १६ ऑगस्ट क्रांती दिनानिमीत्य शहीदांना नमन करण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक उईके हे चिमुरात आले असता अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षीका यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी चे निवेदन आदीवासी टायगर सेनेचे चंद्रपुर जिल्हा महासचीव डॅा. ज्ञानेश्वर जमनाके यांनी पालकमंत्र्यांना दिले. यावेळी भाऊजी टेकाम जांभुळघाट, बाबाराव कुळसंगे चिमुर, सुनील मसराम जांभुळघाट, सीमा ताई मेश्राम मांगलगांव आदी उपस्थीत होते.






