भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश आसेकर व प्रयोगशाळा सहाय्यक बबन खारकर यांना सेवानिवृत्तीनिमित्य कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एका समारंभात नुकताच सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष केशवानंद मेश्राम महाराज लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, सदस्य गोपालराव ठेंगणे, संजय पारधे, उमाकांत गुंडावार, माजी प्राचार्य सचिन सरपटवार, प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य प्रफुल्ल वटे, पर्यवेक्षक आशुतोष सुरावर मंचावर उपस्थित होते.

यावेळी रमेश आसेकर व बबन खारकर यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही सत्कारमूर्तींचा यांचा लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. सौ. संगीता आसेकर व सौ.खारकर ताई यांचाही यावेळी साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालया तर्फे उपप्राचार्य रुपचंद धारणे, लोकसेवा कर्मचारी सहकारी पत संस्थेतर्फे अध्यक्ष शरद राजुरकर, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांतर्फे लता देवगडे यांच्याकडून आसेकर व खारकर यांचा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक वक्त्यांनी निरोप समारंभातून आपल्या मनोगतातून रमेश आसेकर व बबन खारकर यांच्या कार्याचा गौरव करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सत्कारमूर्तीनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांच्या सेवाकाळात केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी वासाडे व आभारप्रदर्शन चंदा लोहकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






