५ ऑक्टोबर ला होणार कवितेच्या घरात सत्कार समारोह
दि. १९ सप्टेंबर
शेगाव बु
सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते ५ आक्टोंबर २०२४ रोजी कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव ( बु ), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील ‘कवितेच्या घरात’ महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांच्या दर्जेदार बालसाहित्याचा सन्मान होणार आहे.
महाराष्ट्राच्या सर्व भागातून कवीनी ह्यामध्ये सहभाग घेतला व त्यातून दर्जेदार कवितासंग्रहाची निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे ह्या दिवशी ‘कौसल्यायन ‘ हे कौसल्याबाई पेटकर लिखित पुस्तक अष्टगंध प्रकाशन तर्फे शेगाव बुद्रूक येथे माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.
या पुस्तकामध्ये त्यांनी आपले जीवनचरित्र सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनुभवलेल्या राजकिय व सामाजिक जीवनाचा यामध्ये उहापोह केला आहे.
ह्या कार्यक्रमात शेगाव गावातील सन्माननीय नागरिक प्रकाशजी पद्मावार ह्यांचा कवितेच्या घरातर्फे सत्कार होणार असल्याची माहिती श्रीकांत पेटकर, कल्याण( संस्थापक,), किशोर पेटकर, नागपूर ( संकल्पनाकार ), डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ( कार्यवाह) डॉ. संदीप भेले, बदलापूर ( कार्यक्रम समन्वयक), सूर्यकांत पाटील, वरोरा ( प्रसिद्धी प्रमुख ) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली






