भद्रावती : अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड टाकळी- बेलोरा-जेना नॉर्थ अँड साउथ कॉल माईन्स तालुका भद्रावती तर्फे गेल्या 23 वर्षांपासून बंद असलेल्या डागा कोल माईन्स लिमिटेडच्या 16 प्रकल्पग्रस्तांना आपल्या कंपनीत नोकरी देऊन न्याय दिला व एक प्रकारे मानवता वादाचे दर्शन घडविले. उपविभागीय अधिकारी वरोरा शिवनंदा लंगडापुरे यांच्या उपस्थितीत बरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात दोन ऑगस्टला पाच जुन्या प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये स्थायी नोकरीचे नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले तसेच पाच ऑगस्टला तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय भद्रावती येथे आठ जुन्या प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये स्थायी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

एकूण 16 जुन्या प्रकल्पग्रस्तांपैकी तेरा प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून तीन प्रकल्पग्रस्तांना लवकरच नोकरीमध्ये सामावून घेतल्या जाईल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. याप्रसंगी अरबिंदो रियालिटी कंपनीचे उपाध्यक्ष व्ही. व्ही. सिंग, मॅनेजर सय्यद तहसीनुल हक, महाप्रबंधक लक्ष्मण राव, मॅनेजर विनोद मत्ते, राजू डोंगे उपस्थित होते.






