1 नंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना मिळावी या आपल्या न्याय मागणीसाठी शिक्षक कर्मचारी 3 मे पासून पून्हा आमरण उपोषणाला आझाद मैदान मुंबई येथे बसणार आहेत. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केले.
राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत नियुक्त झालेल्या सगळ्याच विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली.
याचाच अर्थ असा की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सगळ्यांच विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे . पण त्यातही शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जुन्या पेन्शन योजनेपासून त्यांना वंचित ठेवले आहे.
1नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत आलेल्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून मागील 12 वर्षापासून अनेक प्रकारचे आंदोलने केलीत. मात्र हया मागणीसाठी एक तप ओलांडले तरी आतापर्यंतच्या सरकारने ती मान्य केली नाही.
सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा पलिकडे, विविध समित्या स्थापून एवढ्या वर्षात शासनाने अजूनही त्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना बहाल केली नाही . या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला जीपीएफ खाते मिळालेली असून बरेच दिवस पर्यंत त्याची कपात सुरू होती. परंतु डिसेंबर २०१० ला एक जीआर काढून भविष्य निर्वाह निधी कपात काही ठिकाणी वेतन अधीक्षकांनी तोंडी आदेशाने बंद केली . तेव्हापासूनच या अन्यायाच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून अनेक आंदोलने, धरणे , निवेदने, उपोषणे अशा विधायक मार्गांनी आपली मागणी मान्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पण निराशाच पडली.
नवीन पेन्शन योजना ही 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागू झालेली असतांनाच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना का बंद करण्यात आली ? असा सवाल माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी उपस्थित केला . शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा फार मोठा अन्याय आहे. शासनाच्या अन्य कोणत्याच खात्यामध्ये अशी चूक झाली नाही, मग शिक्षकांवरच हा अन्याय का ? असा संतप्त सवाल दत्तात्रय सावंत यांनी केला.
या अन्यायाविरुद्ध सर्वच शिक्षक संघटनानी एकत्रित येऊन आमरण उपोषणाचा स्वीकार केला आहे, असेही त्यांनी सांगितले .
यातील बरेच शिक्षक कर्मचारी मागील कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडले, काही रिटायर झालेत, मात्र रिटायर झालेल्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, कुटुंब निवृत्ती वेतन योजना प्राप्त झालेली नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली असून 30 – 32 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर मोल मजुरी, काबाडकष्ट करून जीवन जगावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांची हक्काची निवृत्ती वेतन योजना त्यांना मिळून, म्हातारपणाचा आधार असलेली जुनी पेन्शन त्यांना मिळावी व उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हक्काची 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अखेर राज्यातील 26000 हजार अन्यायग्रस्त कर्मचारी 3 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत शासन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही, आश्वासन नको जीआर काढा , असा सर्वांनी निर्धार केला आहे.
या पत्रकार परिषदेत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांचेसह राजेंद्र आसवे पुणे, मारुती गायकवाड सातारा, पुंडलिक पवार सोलापूर, समाधान घाडगे कोल्हापूर , शिवाजी चव्हाण सांगली, अमोल कुलकर्णी तसेच जुनी पेन्शन हक्क शिक्षक संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






