भद्रावती, दि. २७ : बाजार वॉर्ड परिसरातील सुरू असलेल्या रस्त्याच्या आणि विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडे तातडीने तपासणी व दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज संबंधित कामांच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या कामांमध्ये ढिलाई चालणार नाही. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तसेच अपूर्ण कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. असा इशारा सुयोग भोयर, माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख (चंद्रपूर) यांनी दिला आहे.
या प्रसंगी नितीन सातपुते, मनोज भडगरे, अशोक निगम, सुनील पडोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






